रावसाहेब दानवे यांनी तब्बल अडीच लाखांचं वीज बिल थकवलं
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महावितरणचं तब्बल अडीच लाख रुपयांचं वीज बिल थकवलं.
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महावितरणचं तब्बल अडीच लाख रुपयांचं वीज बिल थकवलं आहे. दानवे यांनी त्यांच्या भोकरदन इथल्या घराचं घरघुती वीजबिल तब्बल चार महिन्यांपासून थकवल्याचं समोर आलं आहे. दानवे यांनी 22 मार्च 2017 पासून वीज बिल थकवल्याची माहिती समोर आली आहे.
दानवे यांच्याकडे जुलै महिन्याची थकबाकी 29 हजार 595 इतकी असून एकूण थकबाकी 2 लाख 59 हजार 176 इतकी आहे. एकीकडे महावितरण वीजबिल वसुलीसाठी शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांकडे तगादा लावताना दिसतं. यापूर्वी अनेकदा भर दुष्काळात महावितरण कंपनीनं शेतक-यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा तोडल्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत.
ग्राहकांकडे थकलेल्या वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि ऊर्जामंत्री वारंवार वीजबिल भरण्याचं आवाहन करताना दिसतात. त्यामुळं नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का..? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊर्जामंत्र्यांचं विकबिल भरण्यासाठीचं आवाहन त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसाठी लागू नाही का असा प्रश्न देखील या निमिताने उपस्थित केला जातो आहे.