औद्योगिक विकासाचा दर घटल्याने चिंता वाढली
किरकोळ महागाईचा दर जून महिन्यात १.५४ टक्के आहे. अठरा वर्षात सर्वात खालचा स्तरावर जाऊन हा दर थांबला.
मुंबई : देशात किरकोळ महागाईच्या दरानं पुन्हा एकदा नवा नीचांक स्थापित केला आहे. किरकोळ महागाईचा दर जून महिन्यात १.५४ टक्के आहे. अठरा वर्षात सर्वात खालचा स्तरावर जाऊन हा दर थांबला. जून महिन्यात अन्नधान्याच्या महागाईचा दर घसरल्यानं एकूण महागाई कमी झाली आहे. पण महागाई कमी होत असताना औद्योगिक उत्पादनाचा दरही दिवसेंदिवस घसरत आहे.
मे महिन्यातल्या औद्योगिक उत्पादन अवघ्या १.७ टक्के दरानं वाढलं. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा दर दोन टक्के कमी आहे. महागाई कमी झाली आहे आणि त्यासोबत विकासदरही घटल्यानं रिझर्व्ह बँकेवर व्याजदरात कपात करण्यासाठी दबाव वाढतो आहे. काल जाहीर झालेल्या आकडेवारीनंतर आता पुढच्या महिन्यात उर्जित पटेल आणि मॉनेटरी पॉलिसी कमिटी व्याजदरांविषयी काय भूमिका घेते याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.