मेघा कुचिक, झी २४ तास, मुंबई : नातेसंबंध बिघडत चाललेल, माणूस माणसाला पारखा झालाय, असं आपण नेहमीच म्हणतो... अनेकदा अनुभवतोही... याची आकडेवारी क्वचितच समोर येते... तरुणांना स्वतःचं शिक्षण, करिअर याची चिंता कमी अन् रिलेशनशिपचीच काळजी जास्त असल्याचं एका हेल्पलाईनचे आकडे सांगत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजची तरुण पिढी ही करिअर ओरिएंटेड आहे, असा एक समज आहे. आपण पुढे काय व्हायचंय, आपली आवड कशात आहे? हे मिलेनियल जनरेशनला बरोबर समजतं असं आपण मानतो. मात्र, टाटा इन्स्टिट्यूटच्या एका हेल्पलाईनला आलेल्या आकडेवारीनं या धारणेलाच छेद दिला आहे. मानसिक तणावात असलेल्या १५ ते २५ वयोगटातल्या तरुणांसाठी ही हेल्पलाईन चालवली जाते.


या हेल्पलाईनवर सर्वाधिक कॉल्स हे करिअरबाबत नव्हे, तर रिलेशनशिपबाबत होते


- गेल्या काही महिन्यांमध्ये हेल्पलाईनवर ५८६ कॉल्स आले


- यातले तब्बल १५४ कॉल्स हे नातेसंबंधांबाबत होते


- ६९ कॉल्स हे काऊंसिलिंगसाठी आले


- मानसिक ताण, इमोशनल डिस्ट्रेस याबाबत ५९


- तर समाजातल्या आपल्या प्रतिमेबाबत शंका असलेल्या ४८ जणांनी कॉल केले


- अभ्यास, करिअर याबाबत परीक्षेच्या काळात फक्त ४१ फोन आले


- महिलांवरील अत्याचार, हिंसाचार, ट्रान्सजेंडर्सचे प्रश्न यावरही काही कॉल आले


तसंच रिलेशनशिपबाबत आलेल्या कॉल्समध्ये...


- ब्रेकअप


- जोडीदाराच्या सवयी


- भावनांमध्ये गल्लत


- नकार पचवण्यात अडचण


- अविश्वास


अशी अनेक कारणांचा समावेश होता. सोशल मीडियाचा अतिवापर, कुटुंबामध्ये संवादाचा आभाव, बिझी असलेले पालक अशी अनेक कारणं यामागे आहेत. व्हर्चुअल जगाच्या आहारी जाताना खरं जग हरवत चाललंय. एकटेपणामध्ये साथ हवी असते, पण जोडीदारावर विश्वास नसतो. त्यामुळे प्रेमाच्या शोधामध्ये अनेकदा तणावच पदरी पडतोय, असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांचं म्हणणं आहे. 


तरुणांनाही ही बाब मान्य आहे. रिलेशनशिपमधल्या कुरबुरींमुळे करिअरवर काही प्रमाणात परिणाम होतो, असंही त्यांना वाटतंय. मानसिक स्थिती बिघडली असेल तर अशा हेल्पलाईनचा आधार जरूर घेतला पाहिजे... पण एखाद्या अनोळखी व्यक्तीपेक्षा कुटुंबामध्ये अधिक संवाद ठेवला तर त्याची जास्त मदत होऊ शकेल. फास्ट लाईफ स्टाईलमध्ये ताणतणाव येणारच... त्यापासून सुटका नाही. मात्र त्याचं व्यवस्थापन करायला शिकलं पाहिजे.