मुंबई: कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिवसेंदिवस मदतीचा ओघ वाढताना दिसत आहे. आता या मदतकार्याला रिलायन्सनेही हातभार लावला आहे. रिलायन्सकडून सोमवारी पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी ५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चेक स्वरुपात जमा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे महानायक अमिताभ बच्चन यांनीही आश्वासन दिल्याप्रमाणे पूरग्रस्तांसाठी ५१ लाखांचा धनादेश शासनाकडे सुपूर्द केला आहे. अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी 'कौन बनेगा करोडपती'च्या पत्रकारपरिषदेत पूरग्रस्तांसाठी मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली. तुमच्या मदतीमुळे इतरांनाही पूरग्रस्तांच्या पुनर्वसानासाठी मदत करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


यापूर्वी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनीही पूरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली होती. 


भाजप कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी आलेले पैसे लाटतायत; राजू शेट्टींचा गंभीर आरोप


याशिवाय, राज्यातील सामान्य नागरिकांकडून जमेल त्याप्रकारे कोल्हापूर आणि सांगलीकडे मदत पाठवली जात आहे. पूर ओसरल्यानंतर आता प्रशासनासमोर रोगराई आटोक्यात ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी सफाईकाम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान, काही ठिकाणी पूरग्रस्तांसाठी आलेली मदत हडप केली जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी शासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.