सुशांत पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांवर खोदकामं सुरू आहेत... ही खोदकामं नक्की कोण करतं आणि कशासाठी? हे तुम्हाला माहित असतं का? माहित नसेल तर माहिती करून घ्या... म्हणजे लालबागच्या मेघवाडीतल्या रहिवाशांना जो मनस्ताप सोसावा लागला, तो तुमच्या वाट्याला येणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालबागच्या मेघवाडी परिसरात मंगळवारी आणि बुधवारी अशी पाण्याची कारंजी उडत होती... पण या पाण्याच्या फवा-यांमुळं स्थानिक नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं... मेघवाडी परिसरात पाणीपुरवठा करणा-या पाइपलाइन फुटल्यानं एकच गोंधळ उडाला होता... हा प्रताप नेमका कुणी केला, याचं कोडं नागरिकांना पडलं होतं... याबाबत चौकशी केल्यानंतर जो प्रकार समोर आला, त्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसला.


गेल्या काही दिवसांपासून इथल्या. डॉ. एस. एस. राव मार्गावर महानगर गॅस कंपनीचं पाइपलाइन टाकण्याचं काम सुरू होतं. सोमवारी संध्याकाळी एपीएल कम्युनिकेशन कंपनीचे कर्मचारी आपलं काम संपवून निघून गेले... मात्र रिलायन्स कंपनीचे कंत्राटदार पहाटे तीन वाजता तिथं पोहोचले... महानगर गॅसवाल्यांनी बुजवलेल्या खड्ड्यातच त्यांनी रातोरात केबलची लाइन टाकली. अवघ्या तीन तासात त्यांनी केबल लाइन टाकली पण, घाईगडबडीत काम करताना पाण्याच्या पाइपलाइन फोडून ठेवल्या.


आणखी धक्कादायक बाब, म्हणजे रिलायन्स कंपनीला 7 ते 9 एप्रिल या कालावधीत खोदकाम करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्या काळात रिलायन्सवाल्यांनी कामच केलं नाही... आणि मुदत उलटून गेल्यानंतर महानगर गॅसनं खोदलेल्या खड्ड्यातच गुपचूप लाइन टाकल्या... याचा नाहक त्रास रहिवाशांना सहन करावा लागला. 


याबाबत एफ दक्षिण विभाग पालिका कार्यालयातले सह अभियंता पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. तर विभाग अधिकारी किशोर देसाई यांनी याप्रकरणी संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. याबाबत पालिका रिलायन्सवर काय कारवाई करतेय, याकडं नागरिकांचं लक्ष लागलंय.