देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. त्यानुसार 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्या रुग्णांना कोरोनाची लस दिली जातेय. यामध्ये आता रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्य़ा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याचं जाहीर केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंबियांमध्ये कर्मचाऱ्याचा जोडीदार, पालक आणि मुलांचाच समावेश असू शकतो. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी यांनी ई-मेलद्वारे कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरणासाठी नोंदणी करून घ्यावी, असं आवाहनही नीता अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. 


ई-मेलमध्ये नीता अंबानी यांनी म्हटलंय की, लस घेणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि त्यानेच आपण या महामारीला हरवू शकतो. कोरोना संकटाचा आता हा अंतिम काळ सुरू आहे. तुमची साथ मिळाली तर नक्कीच आपण या महामारीला हरवू. आपण सगळे एकत्र आलो तर जिंकू...नक्कीच जिंकू. आपल्या ई-मेलच्या शेवटी नीता अंबानींनी लिहिलंय की, 'कोरोना हरेगा, इंडिया जितेगा'. 


रिलायन्स फॅमिली डे 2020 मध्येच रिलायन्सचे मॅनेजिंग डिरेक्टर मुकेश अंबानी यांनी सांगितलं होतं की, ज्यावेळी देशात लस उपलब्ध होईल, त्यावेळी रिलायन्समार्फत आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लस दिली जाईल. 


इतरही अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याचं जाहीर केले आहे. यामध्ये टीसीएस, इऩ्फोसिस, अॅक्सेंचर,सारख्या कंपन्यांचा समावेश असल्याचं कळतंय. 
काही कंपन्यांनी ई-मेलद्वारे कर्मचाऱ्यांना लसीकरणासंदर्भात माहितीही पुरवलेली आहे. अर्थात हे लसीकरण केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या वयोगटालाच तूर्तास मिळणार आहे.