मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचं चित्र आहे. कोरोनाबाधितांना बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे. या संदर्भात आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न आणि प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६ लाख २० हजारच्या वर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  रेमडेसेवीरचा आणखी २ ते ३ दिवस तुटवडा जाणार आहे.  पुरवठा सुरळीत होण्याकरता आणखी 2-3 दिवस लागणार असल्याची माहिती राजेंद्र शिंगणेंनी दिली आहे. आता या कंपन्यांच्या सीईओ आणि एमडी यांच्याबरोबर बैठक झाली आहे. ३७ ते ३८ हजार दिवसाला पुरवठा होतो, तो वाढवला जाणार आहे. १९ एप्रिल -२० एप्रिल नंतर पुरवठा सुरळीत होईल, अशी देखील माहिती मिळाली आहे. 


रेमडेसेवीरच्या निर्यांत बंदी घातली आहे. निर्यात बंदी घातलेल्या कंपन्यांना महाराष्ट्रात त्यांचा माल विकण्याची परवानगी दिली आहे. ८ ते १० कंपन्यांचा निर्यातीवर बंदी आहे, त्यांचा रेमडेसेवीरचा साठा पडून आहे, तो महाराष्ट्रात जास्तीत जास्त मिळावा यासाठी त्या कंपन्यांबरोबर आमचे अधिकारी संपर्क करत आहेत. 


 रेमडेसेवीरची उपलब्ध कमी आहे, काही कंपन्यांनी महाराष्ट्रात एकही इंजेक्शन्स पुरवलेले नाही. सरकारी रुग्णालयात रेमडेसेवीरची सुदैवाने कमतरता नाही. पण खाजगी रुग्णालयात तुटवडा जाणवत आहे. पुण्यात तुटवडा जाणवतोय तो दूर करण्यासाठी मी आयुक्तांना सूचना करेन, असं देखील राजेंद्र शिंगणे यावेळी म्हणाले. 


हाफकीनच्या माध्यमातून चांगलं काम होतंय. १५० कोटी खर्च करुन या लसीला आपण सुरुवात करणार आहोत. प्राथमिक खर्चासाठी पुढील मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात येईल. हाफकीनच्या माध्यमातून अनेक देशांना आपण या आधी लसी पुरवल्या आहेत. आता हाफकीनला परवानगी मिळाली आहे.  दीडशे कोटी रुपये खर्च करून लसीला सुरुवात करू. हाफकीनतर्फे 22 कोटी लसी दरवर्षी निर्माण करू, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


पुढच्या कॅबिनेटला ठराव येईल. कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्यावर काम सुरू होईल. महिन्याभरात काम सुरू होईल.  राज्याबरोबरच आपण देशालाही लस पुरवू, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.