अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षं पूर्ण होत असताना, फाळणीच्या कटू आठवणींची खोल जखमही तेवढ्याच वर्षांची झाली आहे. फाळणीच्या काळातला नरसंहार आणि त्यावेळची विदारक परिस्थिती याचा ज्वलंत अनुभव, मुंबईतल्या गोदरेज इंडिया कल्चर लॅबनं पुन्हा एकदा घडवला. यासाठी निमित्त ठरलं ते फाळणी विषयावरच्या 'रिमेम्बरिंग पार्टीशन : म्युझियम ऑफ मेमरीज' या अनोख्या प्रदर्शनातून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या विक्रोळीच्या गोदरेज कल्चरल लॅबमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. फाळणीच्या काळात घडलेल्या घडामोडींचे साक्षीदार असलेले प्रनपाल सिंग कोचर आणि कर्नल जसपालसिंग बक्षी यांच्या या प्रदर्शनातून, फाळणीचे क्षण किती वेदनादायी असतील याची प्रचिती येते. तीन दिवसांच्या या सेशन मधून चर्चा, कलाविष्कार, स्क्रिनींग, प्रदर्शन आणि इतर विविध गोष्टींच्याद्वारे फाळणीच्या त्या कालखंडाची माहिती देण्यात आली. 


फाळणी काळात अत्याचारापासून वाचण्यासाठी ज्या महिलेने विहिरीत उडी घेतली होती तिचा फुलकारी दुपट्टा, त्या काळची घरांची टाळी, भांडी, कराची क्लब ओळखपत्र, तत्कालीन पाकिस्तानी चलन, पोस्टाचं तिकीट, तसंच फाळणीवेळची काही नागरिकांची छायाचित्र आणि त्यांची माहिती, या पार्टिशन म्युझियममधून प्रदर्शित करण्यात आली आहे. 


अत्याचारापासून वाचण्यासाठी विहिरीत उड्या मारुन प्राण दिलेल्या महिलांच्या स्मरणार्थ, इथे व्हेल ऑफ रिमेम्बरन्स ही विहीर या ठिकाणी बनवण्यात आली होती. अनेकांनी त्या कटू आठवणींचा इतिहास या ठिकाणी येऊन जाणून घेतला. 


इतिहासाची पानं सतत चाळली की तो इतिहास आपल्यासाठी अधिक स्पष्ट होतो आणि त्याचे संदर्भही लक्षात राहतात. त्यातून आपला भविष्यकाळ अधिक सुकर व्हायला मदत होते. गोदरेजच्या इंडियन कल्चरल लॅबने या अनोख्या प्रदर्शनाद्वारे हाच प्रयत्न केलाय.