Farm Laws : काँग्रेस उद्या देशभर जल्लोष साजरा करणार, असा आहे प्लान
तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. यानिमित्ताने काँग्रेसतर्फे देशभर किसान विजय दिवस साजरा केला जाणार आहे.
Farm Laws : देशात वादग्रस्त ठरलेले तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. यानिमित्ताने काँग्रेसतर्फे शनिवारी म्हणजे उद्या देशभर किसान विजय दिवस साजरा केला जाणार आहे. चुकीच्या निर्णयांविरुद्ध शेतकऱ्यांचा हा संयमी आणि उत्साही लढा 'किसान विजय दिवस'च्या माध्यमातून ओळखला जाईल, असं काँग्रेसचं म्हटलं आहे. पक्षाने कार्यकर्त्यांना राज्या राज्यात किसान विजय रॅली आणि किसान विजय सभा आयोजित करण्यात सांगितलं आहे.
काँग्रेसची जल्लोष साजरा करणार
काँग्रेसतर्फे उद्या देशभरा किसान विजय दिवस साजर केला जाणार असून देशातील प्रत्येक जिल्ह्यात रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे. त्याचबरोबर मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात संध्याकाळी कँडल मार्चही काढला जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय
कृषी कायदा रद्द करण्याच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, सुमारे 12 महिन्यांच्या गांधीवादी आंदोलनानंतर आज देशातील 62 कोटी शेतकरी आणि शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे. आज 700 हून अधिक शेतकरी कुटुंबांचं बलिदान सार्थकी लागलं आहे. ज्यांच्या कुटुंबांनी न्यायाच्या या लढ्यात आपले प्राण दिले. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्याकडून व्हिडिओ ट्विट
कृषी कायदा मागे घेण्याच्या निर्णयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिले आहे की, "विजय त्यांचा आहे जे अटळ राहिले, पराभव फक्त त्यांचाच होतो, जे अन्नदात्याचे प्राण वाचवू शकत नाहीत. #FarmLawsRepealed"
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली, एमएसपीशी संबंधित मुद्द्यांवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू, असंही पंतप्रधान यांनी म्हटलं आहे.