मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याला झोडपून काढणारा मान्सून आता लवकरच परतीच्या प्रवासाला लागेल. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरू होत आहे. १९ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ जून ते १४ सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक पाऊस झाला. राज्यात १,१९१.५ मिमी पावसाची नोंद झालीय. हा पाऊस राज्याच्या सरासरीच्या तुलनेत ३० टक्के अधिक आहे. राजस्थान, गुजरात, दादरा आणि नगरहवेली, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, अंदमान निकोबार इथेही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. 


वसई, विरारमध्ये  जोरदार पाऊस 


वसई, विरारमध्ये शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झालाय.  सकाळपासूनच सखल भागात पाणी साचलंय. नालासोपाऱ्यातील टाकीरोड, तुळींज रोड, सेन्ट्रल पार्क, गाला नगर, वसंत नगरी, नालासोपारा स्टेशन परिसर, अचोळे रोड, विवा कॉलेज परिसरातही पाणी साचलंय. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर पुन्हा वसईत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.. यंदाच्या पावसाळ्यात वसई पाचव्यांदा पाण्याखाली गेलीय.  ज्यात अनेकांचे नुकसान झाले आहे.. त्यामुळे महानगरपालिकेने ही समस्या गांभीर्याने घेऊन यावर कायमची उपाययोजना करावी अशी मागणी वसईकर करीत आहेत.


ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार 


ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याण डोंबिवलीच्या अनेक भागात पावसामुळे पाणी साचलंय. मुंबईतही उपनगरात पावसाची संततधार सुरूच आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक संथगतीने सुरू आहे. कल्याणच्या शिवाजी चौक, महंमद अली चौक, डोंबिवली खंबाळपाडा या भागात पाणी साचलं होतं. पहाटेपासून पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे.