सामान्यांच्या खिशाला फटका, रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागणार
Rickshaw and taxi fares :रिक्षा प्रवासात तीन रुपये, तर टॅक्सी प्रवासात चार रुपये वाढ होण्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.
मुंबई : Rickshaw and taxi fares :रिक्षा प्रवासात तीन रुपये, तर टॅक्सी प्रवासात चार रुपये वाढ होण्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळे आता सामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.
इंधन दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी व्यवसायावर परिणाम झाला असून उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याचे टॅक्सीचालक सांगत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भाडेवाढीची मागणी प्रलंबित आहे. येत्या आठवडाभरात या प्रलंबित मागणीवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. महागाई वाढल्याने आता पुन्हा एकदा रिक्षा, टॅक्सी दरवाढीची दाट शक्यता आहे.
सीएनजी गॅसचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, त्याशिवाय महागाईतही वाढ झाल्याने टॅक्सी संघटनांनी प्रवास भाडे दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. याबाबत रिक्षा, टॅक्सी संघटना आणि परिवहन विभागाची बैठक होत आहे. या बैठकीत दरवाढी बाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भाडेवाढ अटळ असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोना लॉकडाऊन नंतर सामान्य स्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरात कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ केली. सध्या सीएनजी गॅसचा दर 80 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत आहे. त्यामुळे ही भाडेवाढीची मागणी होत आहे.
टॅक्सी चालक संघटनेने राज्य परिवहन विभागाकडे पाच रुपये दरवाढीची मागणी केली आहे. सध्या टॅक्सीच्या प्रवास भाड्याचा पहिला टप्पा 25 रुपये आहे. हा टप्पा 30 रुपये करण्याची मागणी टॅक्सी चालक संघटनांनी केली आहे. सध्या रिक्षा प्रवासाच्या पहिल्या टप्प्यासाठी 21 रुपये मोजावे लागत आहेत.