वसईत चोरट्यांचा धुमाकूळ; हेड कॉन्स्टेबलच्या घरावर दरोडा
कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसंच २० हजारांची रोकड घेऊन पसार झाले.
वसई: वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात गुन्हेगारी थांबण्याचा काही नाव घेतच नाही. गेल्या महिनाभरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, माणिकपूर पोलीस हातावर हात ठेवू बसले आहेत. काल रात्री चोरट्यांनी तर चक्क पोलिसाच्या घरी हात साफ केला आहे. वसईच्या रेल्वे कॉलनीत ही चोरीची घटना घडली आहे. राजेश यादव याच्या घरी ही चोरी झाली असून यादव हे वसई रेल्वेच्या आरपीएफ विभागात हेड कॉन्स्टेबल आहेत. यादव यांचं कुटुंब लग्न समारंभासाठी २७ नोव्हेंबर पासून गावी गेले होते. रविवारी रात्री चोरट्यांनी दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसंच २० हजारांची रोकड घेऊन पसार झाले.
सकाळी आजूबाजूच्या नागरिकांना चोरी झाल्याचं समजल्यावर यादव यांना ही माहिती मिळाली. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पण जर जनतेची सुरक्षा करणारे पोलीसच जर सुरक्षित नसतील तर सर्व सामान्यांची घर कशी सुरक्षित राहणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता तरी माणिकपूर पोलीस चोरट्यांचा शोध घेणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.