COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : दरवर्षी 300 कोटींचा हप्ता... मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, पेण आणि पुण्यातल्या आरटीओ अधिका-यांच्या हप्तेखोरीची ही आकडेवारी डोळे गरगरवून टाकणारी आहे. ओव्हर लोडिंग वाहन चालक आणि मालकांकडून आरटीओ अधिकारी कशी हप्तेवसुली करतात, घ्या जाणून...


पुणे-मुंबई-पुणे प्रवासात ओव्हरलोड वाहनाचा महिन्याचा 22 हजार रुपये हप्ता घेतला जात असल्याचं समोर आलंय. पेण-पनवेल-मुंबई प्रवासासाठी ओव्हरलोड वाहनासाठी 17 हजार रुपये एवढा मासिक हप्ता असतो. ओव्हरलोड वाहनांच्या मार्गात येणा-या आरटीओच्या संख्येनुसार हा हप्ता वाढत असल्याचं समोर आलंय.


पुणे, पेण, पनवेल, खोपोली, वसई, विरार या भागातून मुंबई आणि आसपासच्या परिसरात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खडी, माती, रेती असणारी वाहनं येतात. एका ओव्हरलोडिंग वाहनाकडून महिन्याकाठी 17 ते 35 हजार रुपयांचा हप्ता दलालांच्या साथीनं अधिकारी घेतात. वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल असल्यास एक टन मालाला चार हजार रूपये दंड आहे आणि प्रत्येक वाहन कमीतकमी 10 ते 15 टन ओव्हर लोड असतंच. हा दंड लागू नये यासाठी वाहन मालक आरटीओ अधिका-यांना कसे हप्ते देतात, ते पाहा...


वाशी टोलनाक्यावर तर हप्ता देणा-यांच्या वाहनांवर कितीही अतिरिक्त सामान असलं तरी कारवाई होत नाही. मात्र जे हप्ता देत नाहीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारला जातो.


अशा ओव्हरलोड वाहनांमुळं शहरात वाहतूक कोंडी होते. शिवाय रस्तेही खराब होतात. ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रण न राहिल्यानं अपघातात होतात आणि त्यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो.


चालता फिरता यमराज असणारी ओव्हरलोड वाहनं आणि भ्रष्ट आरटीओ अधिका-यांच्या या अभद्र युती विरोधात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज बुलंद केलाय...


या भ्रष्टाचाराला परिवहन खात्यातल्या बड्या अधिका-यांचा छुपा पाठिंबा असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम, परिवहन मंत्री दिवाकर रावते ही भ्रष्टाचाराची कीड थांबवू शकतात का, हे आता पाहायचं.