कल्याण-डोंबिवलीत कडक अंमलबजावणी, आज इतके रुग्ण वाढले
सध्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.
ठाणे : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. दरम्यान कल्याण-डोंबिवलीत देखील कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कल्याण डोंबिवलीत आज २६४ रूग आढळून आले असून एकाचा रूग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात १६८ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. रूग्णांची संख्या वाढत असल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे.
आतापर्यंत ६२ हजार ६४ रूग्णांची नोंद झाली असून, सध्या २ हजार ४५५ रूग्णांवर उपचार सुरू आहे. वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी निर्बंध लागू केले आहेत. कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 10 फेब्रुवारीपासून कल्याण डोंबिवलीमध्ये कोवीड प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या निर्णयांच्या अंमलबजावणीला संध्याकाळपासूनच सुरुवात करण्यात आली. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
त्यानूसार कल्याण पश्चिमेतील प्रमूख बाजारपेठ असणाऱ्या परिसरात स्थानिक पोलिसांनी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुकानं बंद करण्याचे अवाहन केले. ज्याला दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत तातडीने दुकाने बंद केली. 7 वाजता दुकाने बंद करण्याबाबत दुकानदार आणि व्यापारी वर्गामध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण होते.
मात्र केडीएमसी प्रशासन आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित परिसरात फिरून दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने लागू केलेले निर्बंध दुकानदार आणि नागरिकांनी काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले.