मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'च्या अग्रलेखातून बुधवारी अभिनेत्री आणि खासदार jaya bachchan  जया बच्चन यांना अनुमोदन देण्यात आलं. काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस गटार म्हणता येणार नाही, जया बच्चन यांनी संसदेत नेमकी हीच भावना बोलून दाखवली असं 'सामना'तील अग्रलेखातून मांडण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय कलाविश्व हे गंगेप्रमाणं पवित्र आहे, असा दावा कोणीही करणार नसलं तरीही त्याला गटार म्हणणं कदापी योग्य नाही, अशा शब्दांनीच अग्रलेखाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीपासूनच जया बच्चन यांच्या भूमिकेचं इथं ठामपणे समर्थन करण्यात आलं आहे. एकिकडे कलाविश्वाबाबत वेडंवाकडं बोलणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच  एरव्ही परखडपणे व्यक्त होणारी (कलाकार) मंडळी मात्र यावेळी मौन बाळगून आहेत. अशा साऱ्यांवर अग्रलेखातून निशाणा साधत त्यांच्यावर जणू कोणाचंतरी नियंत्रण आहे, असा टोलाही लगावण्यात आला. 


दादासाहेब फाळके यांच्या अमूल्य योगदानातून उभ्या राहिलेल्या या कलाविश्वामध्ये अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, जितेंद्र, देव आनंद, कपूर कुटुंब, शाहरुख, सलमान, ऐश्वर्या, वैजयंतीमाला, माधुरी दीक्षित या कलाकारांचं योगदान हे बहुमूल्य असल्याचं म्हणत अशा संपन्न मायानगरीला गटार म्हणणाऱ्यांवर 'सामना'तून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. स्वत: शेण खाऊन दुसऱ्यांवर टीका करणाऱ्यांना या अग्रलेखातून धारेवर धरण्यात आलं. अभिनेत्री कंगना राणौतनं कलाविश्वाबाबत केलेलं वक्तव्य, त्यानंतर ड्रग्ज घेणाऱ्या काही कलाकारांच्या नावांचा गौप्यस्फोट करत कलाविश्वाविषयीच नकारात्मक सूर आळवून आक्षेपार्ह वक्तव्य करणारी मंडळी पाहता मुळात ही भूमिका चुकीची असल्याचं अग्रलेखातून सांगण्यात आलं. 


 


कलाविश्वाला गटार म्हणणाऱ्यांनी लाज सोडली, पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या झांजा असल्यामुळं या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. सत्ताधारी आणि कलाविश्वाशी बेईमानी करणाऱ्यांचा समाचार घेत हेच कलाविश्व संकटसमयी का प्रकारे सर्वतोपरी मदतीसाठी पुढे सरसावलं आहे, यावरही सामनातून प्रकाशझोत टाकण्यात आला.