मुंबई : अजित पवारांनी भाजपसोबत हात मिळवणीकेल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून चांगला समाचार घेण्यात आला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकेचा भडीमार करण्यात आला आहे. अजित पवाराचं बंड फसल्यानं भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटल्याची टीका देखील 'सामना'तून केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांचं बंड फसलंय. आणि भाजपच्या  भ्रमाचा भोपळा फुटलाय असं सांगत 'सामना'तून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. भाजपला आता सत्ता मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रूपात भाजपाने एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे अशी जोरदार टीका देखील केली आहे. 


काय म्हटलंय 'सामना'त


देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने हे काय जन्मास घातले आहे? मुंडके गाढवाचे व धड रेड्याचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारून हे लोक एकमेकांना लाडू भरवतात. पण लाडू भरवताना तो त्यांच्या नरड्याखाली उतरवत नव्हता व चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. हे लाडू त्यांना पचतील काय, असा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर नाही असे नाही. 


'अजित पवारांना तुरूंगात चक्की पिसायला पाठवू' असे सांगणारे भगतगण फडणवीस 'अजित पवार आगे बढो' च्या घोषणा देत होते. पण अजित पवार त्या जल्लोषात कुठेच दिसत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 


तसेच भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी तत्व, नीतिमत्ता वगैरे गुंडाळून ठेवली आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला व तळाला जाण्याची तयारी आहे. पण काही झालं तरी त्यांना विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता येणार नाही असं देखील सामनातून अधोरेखित केलं आहे. 


अजित पवार आणि फडणवीसांनंतर राज्यपालांवर देखील टीका केली आहे. सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून राज्यपालांकडून भाजपास सरकार स्थापनेची संधी होती. राज्यपाल त्यांच्याच पक्षाचे आणि भूमिकेते असल्याने भगतसिंह कोश्यारी यांनी भाजप पुढाऱ्यांना आमंत्रित केलेच होते. शिवसेनेला बोलावले पण सत्तास्थापनेसाठी चोवीस तासच दिले होते. आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू केली. भाजपने अजित पवारांना फसवले व सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला फसवल्याचे सामनातून म्हटले आहे.