मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप नाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या 'लेटरबॉम्ब'मुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रामुळे राजकारणात गदारोळ सुरू झाला आहे. या पत्राच्या माध्यमातून शिवसेनेने भाजपला युतीची हाक तर दिली नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. (Saamana, Editorial, MLA Pratap Sarnaik, Letter, CM Uddhav Thackeray ) तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही शिवसेनेची राजकीय खेळी आहे की काय, याचीच चर्चा जास्त रंगली आहे. असं असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून 'ताजा कलम!' मांडला आहे. 


काय म्हटलंय 'सामना'च्या अग्रलेखात? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे स्थान संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च आहे. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलेच आहे. मुळात ‘वाकडे–तिकडे’ काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कोठे? तरीही ‘विनाकारण त्रास’ असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल. आमच्या लेखाचाही ताजा कलम इतकाच आहे की, शिवसेना आमदारांच्या पत्राची क्रिया–प्रतिक्रिया संपली असेल तर पुढच्या कामास लागूया!


केंद्रीय तपास यंत्रणांचा विनाकारण त्रास होत आहे. त्रास टाळायचा असेल तर भाजपशी किंवा थेट मोदींशी जुळवून घ्या, अशा आशयाचे एक पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले आहे. सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात इतर बरेच विषय मांडले आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत. सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. एका केसमध्ये जामीन मिळाला की तत्काळ दुसऱया केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवले जात आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या संपूर्ण पत्रातील ‘विनाकारण त्रास’ हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत. सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय कामांसाठी वापर होत आहे.


उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहोळय़ात जे भाषण केले त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संघर्षाचे व शौर्याचे तोंडभरून कौतुक केले. ऐन निवडणूक मोसमात तृणमूलच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आवळला गेला होता. एवढेच नव्हे तर, विधानसभा निवडणूक जिंकूनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री व इतर दोघांना 'नारद’ घोटाळ्यात बेकायदेशीर अटक केली गेली. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी स्वतः सीबीआय कार्यालयात घुसून सगळय़ांचीच दाणादाण उडवली. त्या घोटाळय़ाचे इतर दोन प्रमुख नेते (त्यातले एक सुखेन्दू अधिकारी) भाजपमध्ये गेल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे सीबीआयने टाळले.



‘विनाकारण त्रास’ जो काही आहे तो हाच. जे गुन्हेगार आमच्याबरोबर आहेत ते सोडले जातील. जे भाजपबरोबर नाहीत त्यांना विनाकारण त्रास देऊन अडकवले जाईल हे धोरण पश्चिम बंगालात राबवले तेच महाराष्ट्रात राबविण्याची तयारी आधीच सुरू झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सरकार आहे व तीनही पक्षांना हे विनाकारण त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱया प्रत्येकाने करायलाच हवा. बरे-वाईट दिवस येतच असतात. वाईट दिवसही निघून जातात. सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते. अर्जुनासारखे लढायचे, शिवाजी महाराजांसारखे शत्रूवर चाल करून जायचे की शत्रूशी ‘तह’ करून मांडलिकी पद्धतीने गुजराण करायची? मोगलांपुढे शिवरायांनी जुळवून घेतले असते तर दऱ्याखोऱ्यात भटकून लढाया करण्याचे जीवन त्यांच्या नशिबी आले नसते. मोगल बादशहाने त्यांना एखादी मनसबदारी बहाल केली असती व इतर राजांप्रमाणे शिवरायांना त्यावर पिढय़ान् पिढय़ा गुजराण करता आली असती; पण शिवरायांनी तसे केले असते तर इतिहासपुरुष, महान योद्धा, स्वाभिमान, अभिमानाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून आपण आज जसे त्यांच्यापुढे नतमस्तक होतो तसे झालो नसतो.


आणीबाणीच्या काळात शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाहीतर परिणामांस सामोरे जा, अशा दाबदबावाला बळी न जाता शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमानाने शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले. म्हणून आजची शिवसेना तेजाने तळपताना दिसत आहे. ही शिवसेना निखारा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जतन करून ठेवली. म्हणून आजही सामान्यातल्या सामान्य तरुणांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदे भोगता आली. कोणत्याही त्रासाची, छळाची, न्याय-अन्यायाची पर्वा न करता लढत राहाणारा शिवसैनिक हेच शिवसेनेचे ‘बळ’ आहे. या स्वबळावर कितीही वार करा, त्या घावातून निघणाऱया प्रत्येक रक्ताच्या थेंबातून शिवसेना पुनः पुन्हा जन्म घेत असते. महाराष्ट्रातले राजकारण आज एका वेगळय़ा वळणावर येऊन पोहोचले आहे. हे वळण स्वाभिमानाचे आहे. राज्याच्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष सरकार चालवताना एकमेकांचा मान-सन्मान, स्वाभिमान जपत पुढे जात आहेत.


महाराष्ट्राच्या जनतेने हा प्रयोग स्वीकारला आहे. देशाला राष्ट्रीय पातळीवर याच प्रयोगाची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे स्थान संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च आहे. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलेच आहे. मुळात ‘वाकडे-तिकडे’ काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कोठे? तरीही ‘विनाकारण त्रास’ असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल. आमच्या लेखाचाही ताजा कलम इतकाच आहे की, शिवसेना आमदारांच्या पत्राची क्रिया-प्रतिक्रिया संपली असेल तर पुढच्या कामास लागूया!