मुंबई: पेट्रोल पंपांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावण्याची सक्ती होत असल्याच्या आरोपावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या आरोपावरून  ‘फोटोसेशन’पेक्षा पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर आहेत’ असे फलक लागतील हे पहा, असा टोला लगावतानाच, मोदींच्या फोटोसोबत त्यांच्या कारकीर्दीतील पेट्रोल–डिझेलच्या वाढत्या दरांचाही फलक लावा., असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी 'पेट्रोल पंपांवर मोदींचा फोटो, दरवाढीचा फलकही लावा!', या मथळ्याखाली एक लेख लिहिला आहे. या लेखात ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे लिलितात, 'महाराष्ट्रात आधीच्या शिवसेना–भाजप युती सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर होते. सरकारने ठरवले म्हणून ते शक्य झाले. मग आता जनतेचा प्रधानसेवक म्हणवून घेणाऱ्यांच्या राज्यात निदान उरलेले काही महिने का होईना पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर ठेवणे, जनतेला जगण्याचे स्थैर्य देणे का शक्य नसावे? त्यात पेट्रोल पंपांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावण्याची सक्ती होत असल्याचा आरोप होत आहे. या ‘फोटोसेशन’पेक्षा पेट्रोल पंपांवर ‘पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर आहेत’ असे फलक लागतील हे पहा अन्यथा मोदींच्या फोटोसोबत त्यांच्या कारकीर्दीतील पेट्रोल–डिझेलच्या वाढत्या दरांचाही फलक लावा', असे ठाकरे यांनी म्हटले आहे.


दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरांचा पुन्हा ‘विक्रमी’ भडका उडाला आहे. पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८५ रुपयांवर पोहोचला आहे, तर डिझेलदेखील ७३ रुपये प्रतिलिटरवर गेले आहे. म्हणजे भाववाढ कमी करणे तर सोडाच, पण ती रोखणेदेखील सरकारला जमलेले नाही. काही महिन्यांपूर्वी पेट्रोल असेच ८५ रुपये प्रतिलिटर एवढे महागले होते. नंतर ते काही पैशांनी स्वस्त झाले. मात्र हा ‘आनंद’देखील सामान्य जनतेला फार दिवस मिळू नये असाच सरकारचा कारभार आहे, असा चिमटाही ठाकरे यांनी सरकारला काढला आहे.