अमित कोटेचा, झी मीडिया, मुंबई : फरसाण कंपनीत आग लागल्यावर ते दरवाजे ठोठावत राहिले पण दरवाजा आतून बंद असल्याने १२ जीवांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मुंबईत काम करण्यासाठी आलेल्या दुर्दैवी अभागी जिवांची कहाणी खरोखर चटका लावून जाणारी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थ नगरातून रोजीरोटीच्या शोधार्थ मुंबईत आलेल्या रामनरेश गुप्तांचा हा फोटो... साकीनाक्यात फरसाण फॅक्टरीत बळी गेलेला एक अभागी जीव... अडीच वर्षांपूर्वी आपला भाऊ अर्जुन गुप्तासह रामनरेश गुप्ता इथे मुंबईत आले होते. भाऊ अर्जुनला तर तेव्हा याची कल्पनाही नव्हती की ज्या दुकानात स्वादीष्ट फरसाण बनवण्यासाठी आपण भावाला नोकरी मिळवून दिली तिथे त्याची चिताच रचली जाईल. 


या दुकानात एकूण १६ कामगार काम करत होते. चार जण जीव वाचवण्यात यशस्वी झाले तर १२ जण वाचू शकले नाहीत. या अपघातात १९ ते २५ वयोगटातल्या कामगारांचे बळी गेलेत. अर्जुन आणि रामनरेश यांचा तिसरा भाऊ दिलीपही याच कंपनीच्या कल्याणमधल्या दुकानात काम करतो. दर रविवारी तिन्ही भाऊ एकमेकांना भेटायचे.


पाहता पाहता एक फॅक्टरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामागे कोणता घातपात नाही ना? याचाही तपास केला जातोय. नियमांचं उल्लंघन करून कारखाना चालवला जात असल्याचा संशय आहेच. इतक्या छोट्या दुकानात तब्बल १६ लोक दाटीवाटीत काम करत होते यावरून संशयाला जागा आहेच. 


मात्र अशाप्रकारे सुरू असलेलं हे एकमेव दुकान नाही. मुंबईत अशी अनेक दुकानं सर्रास सुरू आहेत. अशा अनेक दुकानात शेकडो मजूर जिवावर उदार होऊन काम करत आहेत. मनपाने अशा दुकानांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.