डिसेंबरच्या पंधरावड्यात तब्बल ९ हजार घरांची विक्री
कोरोना काळातही तयार घरांना मागणी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने घर घेण्यार्यांना मुद्रांक शुल्क आणि गृह कर्जात सूट दिल्यामुळे, ग्राहकांना फायदा झाला आहे. कोरोना काळातही लोकांनी मोठ्या प्रमाणात घरं खरेदी केल्यामुळे, रिअल इस्टेट क्षेत्रालाही दिलासा मिळाला आहे. नोंदणी विभागानं दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या पहिल्या पंधरावड्यातच जवळजवळ 9 हजार घरांची विक्री झाली आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रिअल इस्टेट भागात पूर्वीपासून मंदी सुरू होती. त्यात यंदाच्या काळात कोरोना संकटामुळे त्यात भर पडली. या मंदीतून बाहेर पडायला वर्षे लागतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला होता.
कोरोनाच्या काळात सगळ्याच व्यवसायांना फटका बसला. यामध्ये रिअल इस्टेट हे क्षेत्रही होतं. डिसेंबर महिन्यातील १९ दिवसांत मुंबईतील मालमत्तांच्या नोंदणीने १० हजार ४५७ चा आकडा गाठला आहे. २०१२ नंतर प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत.
या महिन्यात १९ डिसेंबपर्यंत राज्यातील मालमत्तांचे खरेदी-विक्री व्यवहार एक लाख ३९ हजारांपर्यंत पोहचले . घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी करण्यासाठी मोठय़ा संख्येने ग्राहक नोंदणी कार्यालयात येत आहेत. हा प्रतिसाद पाहता डिसेंबरअखेपर्यंत घरांच्या विक्रीत आणखी मोठी भर पडण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या काळातही घरांना सर्वाधिक मागणी आहे. महत्वाचं म्हणजे ग्राहकांकडून तयार घरांना सर्वाधिक मागणी आहे. आताच्या परिस्थितीत गृहकर्जावरील व्याजदर कमी झाले आहेत. मागील दोन-तीन वर्षांत घरांच्या किमतीही १५ ते १७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. सध्या राज्य सरकारच्या सवलतीमुळे यात भर पडली आहे. विकासकांनी सवलती सुरूच ठेवल्या तर भविष्यात घर घेण्याच्या विचारात असलेले ग्राहकही आताच नोंदणी करतील. ग्राहकांकडून सध्या तयार घरांना अधिक मागणी आहे