मुंबई: सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा आहे. या प्रकरणात काही सेलिब्रिटींनी तनुश्री दत्ताला पाठिंबा दिला आहे. मात्र, बहुतांश कलाकारांनी याविषयी मौन बाळगणेच पसंत केले आहे. अभिनेता सलमान खान याच्या मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत याचा प्रत्यय आला. यावेळी पत्रकारांनी अडचणीचे प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर सलमान खान चांगलाच वैतागला होता. 


एका महिला पत्रकाराने तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल सलमानाची प्रतिक्रिया विचारली. बॉलीवूडमध्ये महिला सबलीकरणाविषयी वारंवार बोलले जाते. मात्र, अशा प्रकरणांमध्ये कलाकार ठाम भूमिका घ्यायला नकार देतात, अशी नाराजी या महिला पत्रकाराने व्यक्त केली. त्यावेळी सलमान खानने म्हटले की, मला या प्रकरणाची काहीच माहिती नाही. मला हे प्रकरण नक्की काय आहे, ते समजू दे. त्यानंतर मी यावर काही बोलू शकेन, असे सांगत सलमान खानने वेळ मारून नेली.