सलमान खान धमकी प्रकरण, आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल
सलमान खान धमकी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासाला मोठा झटका बसला
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) धमकी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासाला मोठा झटका बसला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या सौरव उर्फ महाकालने मुंबई क्राइम ब्रांचला दिलेली सलमान प्रकरणातील माहिती खोटी असल्याचे समोर आलं आहे.
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात सौरभ महाकाळला पुणे पोलिसांनी केली अटक केली. सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ उर्फ महाकाळ याला नारायणगाव मधून अटक करण्यात आल्या नंतर मुंबई पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली होती त्यात त्याने दिलेली माहीती खोटी निघाल्याने मुंबई गुन्हे शाखेला झटका बसला आहे.
गोल्डी बराडच्या आदेशानुसार राजस्थानच्या जलोर इथून 3 जण मुंबईत आले होते आणि त्यांनी सलमान खानच्या घरा जवळ धमकीचं पत्र ठेवलं होतं. ते तिघेही पालघर येथे वास्तवास राहिले आणि एका कारखान्यात कामाला होते, अशी माहिती सौरभ उर्फ महाकालने दिली होती.
मात्र जेव्हा क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी पालघर ,वाडा तसंच राजस्थान इथं जाऊन चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. सलमान खानच्या घरा जवळ धमकीचं पत्र ठेवणारा हा आधीच अटकेत असून तो जेल मध्ये असल्याचं उघड झालं आहे. राजस्थानच्या शिरोही मधील एका ज्वेलर्स दुकानाच्या लुटी संदर्भात आणि हत्यारे तस्करी संदर्भात तो आरोपी आधीच जेलमध्ये आहे.
त्यामुळे महाकालने दिलेली माहिती खोटी निघाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार धमकीचं पत्र ठेवणाऱ्या तिघांना सौरभ उर्फ महाकाल हा आता भेटला नसून 7 महिन्यापूर्वीच तो कल्याणमध्ये भेटला होता.
गुन्हे शाखेच्या सूत्रानुसार सलमान खान प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड, विक्रम बराड यांचा सहभाग असल्याचे पुरावे अध्याप मिळाले नसून पोलीस तपास सुरू आहे.