`...बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल`, Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; `सेटलमेंट`चा मेसेज व्हायरल
Salman Khan Threat Case Lawrence Bishnoi : अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई गँग यांच्यामध्ये असणारी संघर्षाची ठिणगी आता अधिक गंभीररित्या धुमसताना दिसत आहे.
मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आता लॉरेन्स बिष्णोई गँगनं उघडपणे पुन्हा एकदा थेट सलमान खानला धमकी दिली आहे. काळवीट हत्येप्रकरणी ताणला गेलेला हा वाद आता अतिशय गंभीर आणि तितक्याच संवेदनशील वळणावर पोहोचला असून, पोलीस यंत्रणा आणि सलमानच्या भोवती असणारं सुरक्षा रक्षकांचं कवचही या धर्तीवर सतर्क झालं आहे. (Salman Khan Threat Case Lawrence Bishnoi)
एकिकडे दर दिवशी बिष्णोई गँग आणि या गँगशी संबंध असणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस सातत्यानं प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे सलमानला आणखी एक धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पाठवलेल्या संदेशात (Message) ही धमकी देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या जवळचं असल्याचं सांगितल्यानं एकच खळबळ माजली आहे.
नेमका कोणी पाठवला संदेश?
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला. लॉरेन्स बिष्णोईशी असलेलं दीर्घकालीन वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं केलेल्या दाव्यानुसार तो सलमान आणि बिष्णोई गँगमध्ये समेट घडवून आणणार आहे, त्यासाठी त्याने पैसे मागितले आहेत. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल असा थेट इशारा त्यानं या मेसेजच्या माध्यमातून दिला आहे.
हेसुद्धा वाचा : सोन्याहून पिवळं; केंद्राप्रमाणं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार दणदणीत पगारवाढ, कसा होईल फायदा?
ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या मेसेजमध्ये मेसेजरनं म्हटलंय, हे हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल, लॉरेन्स बिष्णोईशी वैर संपवायचं असेल, तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल'. हा मेसेज मिळताच मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे शिवाय संरक्षण यंत्रणाही आता अधिकच सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे.