मुंबई: राज्यात महाविकासआघाडीची स्थापन झाल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अनेकदा परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आज सभागृहात अनोखा समन्वय दिसून आला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 'सामना' हा आमचाच पेपर असल्याचे म्हटले. ते शुक्रवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देत होते. यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, विरोधी पक्षांकडून अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे. मात्र, अनेक वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांनी अर्थसंकल्पाविषयी सकारात्मक बातम्या दिल्या आहेत. यासाठी अजितदादांनी विधानसभेत अर्थसंकल्पाविषयी छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे दाखवली. यावेळी 'सामना'तील बातमीचे कात्रण हातात आल्यानंतर अजितदादांनी हा तर आमचाच पेपर आहे, असे म्हटले. यानंतर सभागृहात हशा पिकला. त्यावेळी अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना तुम्ही 'सामना' वाचतच नव्हता, असा टोलाही लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना 'सामना'तील अग्रलेख नेहमी चर्चेचा विषय ठरत असत. या अग्रलेखांमधून अनेकदा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करण्यात येत असे. याविषयी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी मी 'सामना' वाचत नाही, असे सांगितले होते. 


दरम्यान, अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी प्रादेशिक समतोलाचा आरोप फेटाळून लावला. अर्थसंकल्पात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कुठे दिसत नाही, अशी टीका फडणवीस करतात. मात्र, आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. विरोधकांनी उघड्या डोळ्यांनी अर्थसंकल्प पाहिला तर बऱ्याच गोष्टी दिसतील, असे अजित पवार यांनी सांगितले.