संघर्षाला हवी साथ : सावित्री नदीवरच्या दुर्घटनेत तिची स्वप्न वाहून गेली पण...
आई-वडिलांच्या मृत्यूमुळं अनाथ झालेल्या वैष्णवी आणि तिच्या भावाची स्वप्नं सावित्री नदीवरच्या पुलासारखीच कोसळून गेली
प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : तीन वर्षांपूर्वी तिच्या आईवडिलांचं छत्र हरपलं. घरातला कमावता आधार निघून गेला. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत देखील तिनं जिद्दीनं अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवले. मुंबईच्या वैष्णवी वाजेची ही संघर्ष कहाणी...
३ ऑगस्ट २०१६ ची ती काळरात्र... मुसळधार पावसामुळं महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल कोसळला. मुंबईला येणारी अख्खीच्या अख्खी एसटी बस नदीत वाहून गेली. एसटीतल्या ४२ प्रवाशांचे बळी गेले. त्यात संतोष आणि संपदा वाजेंचाही दुर्दैवी मृत्यू झाला. वैष्णवी आणि तिचा भाऊ आई-वडिलांच्या मायेला कायमचे पोरके झाले.
वैष्णवीचे वडील फुलांचे हार बनवायचे, तर आई लोकांच्या घरची धुणीभांडी करायची. त्यांच्या मृत्यूमुळं अनाथ झालेल्या वैष्णवी आणि तिच्या भावाची स्वप्नं सावित्री नदीवरच्या पुलासारखीच कोसळून गेली. आईवडिलांचं छत्र हरपल्यानंतर चुलत काकांनी तिचा सांभाळ केला. त्यांचीही परिस्थिती बेताचीच... घाटकोपरच्या पार्कसाइट डोंगरावर अतिशय दाटीवाटीच्या वस्तीत दहा बाय दहाच्या खोलीत ते राहतात. तीनएक महिन्यांपूर्वी काकांचंही निधन झालं.
अशा सगळ्या संकटांवर मात करत, वैष्णवी वाजेनं दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवले. दहावीला भावापेक्षा जास्त गुण मिळवेन, असं वचन वैष्णवीनं दिवंगत बाबांना दिलं होतं. ते तिनं खरं करून दाखवलं. वैष्णवीच्या या यशात घाटकोपरच्या ज्ञानप्रकाश हायस्कूलच्या शिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे.
सावित्री पूल दुर्घटनेनंतर वैष्णवी वाजेला सरकारकडून आर्थिक मदत मिळाली. समाजानंही मदतीचा हात पुढं केला. त्यातून आतापर्यंतची गुजराण झाली. पण पुढं काय? हा प्रश्न कायम आहे. वैष्णवीला वास्तुविशारद व्हायचंय... शाळा बांधायचीय. त्यासाठी गरज आहे ती मदतीच्या हातांची... तुम्ही करणार ना वैष्णवीला आर्थिक मदत?
संघर्षाला हवी साथ
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी थेट त्यांच्याच नावे पुढील पत्त्यावर धनादेश पाठवा
झी २४ तास, मॅरेथॉन फ्युचरेक्स, १४ वा मजला, ए विंग, ना म जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३
संपर्क क्रमांक - ९३७२९३७५६९