प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : वडिलांचं छत्र हरपलेलं... आई घरकाम करून कसंबसं घर चालवणारी... अशा प्रतिकूल परिस्थितीत, घाटकोपरच्या मानसी सकपाळनं दहावीला ९४ टक्के गुण मिळवले... मानसीला आता डॉक्टर व्हायचंय... तिचं हे स्वप्न खरंच पूर्ण होईल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानसी सकपाळ... घाटकोपरच्या जव्हार भाई प्लॉट वसाहतीत ती राहते. आठ बाय आठच्या छोट्याशा घराच्या पोटमाळ्यावर... हे घरही स्वतःचं नाही, तर भाड्याचं... आई वडिलांपासून वेगळी राहायची... गेल्या वर्षी वडिलांचं छत्रही हरपलं... तेव्हापासून या घरात तिघीच... मानसी, तिची आई निर्मला आणि ७५ वर्षांची आजी...


घरसंसार चालवण्यासाठी मानसीची आई लोकांच्या घरी धुणी-भांडी करते. त्यातून घर खर्च, मानसीचं शिक्षण आणि वृद्ध आजीचं आजारपण असा संसाराचा गाडा ती कसाबसा चालवते. अशा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही मानसी खचून गेली नाही. आईला घरकामात मदत करत आणि वेळेचं योग्य नियोजन करत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मानसी सकपाळनं दहावीला ९४ टक्के गुण मिळवले. भविष्यात डॉक्टर होऊन आईची आणि समाजाची सेवा करायची तिची इच्छा आहे.


मानसीनं जे घवघवीत यश मिळवलं, त्यामध्ये तिच्या ज्ञानप्रकाश विद्यालय शाळेतल्या शिक्षकांचंही मोठं योगदान आहे. शाळेतून पहिल्या आलेल्या या गुणी मुलीचं स्वप्न साकारण्यासाठी समाजानं मदतीचा हात पुढं करावा, असं आवाहन गुरूजनांनी केलंय.


परिस्थितीशी दोन हात करत मानसीनं दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलं. पण आयुष्यातली पुढची लढाई आणखी खडतर असेल... डॉक्टर बनण्याची मानसीची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी गरज आहे ती दानशूर हातांची... तुम्हीही कराल ना मानसीला मदत..?


या गुणवंतांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी तुम्हीही पुढे या.... त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या नावानंच चेक काढा... 


संपर्कासाठी :


झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड, मधू इंडस्ट्रीयल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०१३


संपर्क : 022 - 24827821


ई-मेल : response.zeemedia@gmail.com