प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : एफ वन अर्थात 'फॉर्म्युला रेस' ही आतापर्यंत तशी पुरुषांची मक्तेदारी... ती मोडीत काढत एका मुंबईकर मुलीनं नवा झेंडा रोवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉर्म्युला कार्स... वेगाचा सगळा खेळ... डोळ्याची पापणी लवते न लवते तोच अदृष्य होणाऱ्या गाड्या... कानाचे पडदे फाटणारा आवाज... फॉर्म्युला रेसिंगचा हा सगळा थरार... रुढ अर्थानं ही पुरुषांची मक्तेदारी... पण ती मोडीत काढली संजना धुल्लानं... तिनं कोईम्बतूरमध्ये झालेल्या फॉर्म्युला भारत स्पर्धेत १०० फॉर्म्युला रेस चालकांमधून तिसरा क्रमांक मिळवलाय.


वयाच्या १६ व्या वर्षापासूनच संजनाला गाडी चालवायची आवड होती. ती १६ व्या वर्षी बुलेट चालवायला लागली... मग तिला फॉर्म्युला कारच्या वेगाचे वेध लागले आणि तिनं सराव सुरू केला... कोईम्बतूरमध्ये झालेल्या फॉर्म्युला भारत स्पर्धेत १०० चालकांपैकी संजना एकमेव महिला चालक होती. त्यामध्ये तिनं ९७ पुरुष चालकांना मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला.


या स्पर्धेसाठी संजनानं बराच सराव केला... त्याचबरोबर तिची ही कारही तिनं कॉलेजमध्येच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं तयार केलीय. मुली या कुठल्याच क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाहीत, हेही यानिमित्तानं संजनानं दाखवून दिलं. पुढच्या वर्षी या स्पर्धेत आणखी मुली सहभागी होतील, असा विश्वास के जे सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या शुभा पंडित यांनी महाविद्यालयाच्या वतीनं व्यक्त केलाय.


संजनाचं हे यश कौतुकास्पद... पुढेही तिनं अशीच वेगवान कामगिरी करावी, या शुभेच्छा!