मुंबई : अवैध फेरीवाल्यांवरून मनसे आणि काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्यात वादंग निर्माण झाले आहे. फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात आज दुपारी मालाडमध्ये मनसे विभाग प्रमुख सुशांत माळवदे हे गंभीर जखमी झाले आहेत.


रोज रोज फेरीवाले मार कसे खातील- निरूपम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेवर बोलताना काँग्रेसचे संजय निरूपम यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितलं की, 'फेरीवाल्यांना रोज मनसे कार्यकर्त्यांकडून हटकलं जातंय, मारलं जातंय, पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत, रोज फेरीवाले माझ्याकडे येतात आणि सांगतात की आम्हाला मारतात, तेव्हा रोज रोज मी त्यांना कसं सांगू की तुम्ही मार खा. यामुळे कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय नाही' संजय निरूपम यांनी म्हटलं आहे.


सुशांत माळवदे या हल्ल्यात गंभीर जखमी


या घटनेनंतर आणखी परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. कारण सुशांत माळवदे या हल्ल्यात गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील मालाडच्या दिशेने निघाले आहेत.


या घटनेचे परिणाम भोगावे लागतील-मनसे


संजय निरूपम यांना या घटनेचे परिणाम भोगावे लागतील, असं मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं, कार्यकर्त्यांवरील हल्ला सहन केला जाणार नाही, असं देखील संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.


बीएमसी लायसन्स का देत नाही- संजय निरूपम


आम्ही बीएमसीकडे हॉकर्स झोन आणि फेरीवाल्यांच्या लायसन्सची मागणी करतो, पण बीएमसीकडून दिले जात नाहीत, ज्या दिवशी ते दिले जातील, त्यानंतर मी फेरीवाल्यांच्या विरोधात उभा राहिन असं संजय निरूपम यांनी म्हटलं आहे.