COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरी स्थानबद्ध केलंय. संजय निरुपम यांच्या अंधेरीतल्या घरी त्यांना स्थानबद्ध करण्यात आलंय. गेल्यावेळी अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केलीय.  आजच्याच दिवशी पोलिसांनी माझ्या घरावर नजर का ठेवतायत, असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. अमित शहांना आमच्या प्रश्नांची भीती वाटत असेल. आम्ही अमित शहा आणि भाजप नेत्यांना घेराव घालू असं भाजप सरकारला वाटलं असेल, अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे. 


अमित शहा-उद्धव ठाकरेंची भेट 


या मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शहा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहत. या भेटीदरम्यान आगामी निवडणुकीसाठी सेना-भाजप युतीची चर्चा होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 


'संपर्क फॉर समर्थन


'संपर्क फॉर समर्थन' अशी मोहीम भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अमित शाह उद्या मुंबईतील विविध प्रसिद्ध व्यक्तींना भेटणार आहेत. या व्यक्तींमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित, उद्योजक रतन टाटा, गायिका लता मंगेशकर यांचा समावेश आहे. 


माधुरीला राज्यसभेची ऑफर


भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली, माधुरीच्या मुंबईतील जुहू येथील घरी जाऊन अमित शहा यांनी माधुरीची भेट घेतली. यावेळी माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची खासदारकीची ऑफर देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपकडून जरी माधुरी दीक्षित यांना भाजप खासदारकीची ऑफर देण्यात आली असली, असं म्हटलं जात असलं, तरी माधुरी दीक्षित यावर नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.