मनसेच्या नपुंसक कार्यकर्त्यांचा हा हल्ला - संजय निरूपम
या हल्ल्यावर मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : कॉंग्रेस प्रदेश कार्यालयाची तोडफोडची जबाबदारी मनसेने स्विकारली आहे. याप्रकरणी मनसेचे तीन कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील हा मराठी-अमराठी वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. तर या हल्ल्यावर मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
‘नपुंसक आणि लुख्खे कार्यकर्ते’
‘मनसेच्या नपुंसक कार्यकर्त्यांनी जेव्हा ऑफिसमध्ये कुणीच नव्हतं तेव्हा हल्ला केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई नाही केली तर मनसेला सडेतोड उत्तर दिलं जाईल’, असे ट्विट त्यांनी केलंय.
‘सर्जिकल स्ट्राईक’
कॉंग्रेस कार्यालयाची ही तोडफोड मनसेने केल्याचे समोर आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्विट केले आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..’ असे ट्विट त्यांनी केले आहे. याप्रकरणी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
‘मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला’
फेरीवाला आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राडेबाजीला सुरुवात झाली होती. विक्रोळी येथे काँग्रेस समर्थकांनी मनसे कार्यकर्त्यांना रविवारी रात्री जबर मारहाण केली होती. यावर ‘मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला असून, यापुढे त्यांनी गुंडगिरी सोडून द्यावी,’ अशा शब्दांत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.