Sanjay Raut : संजय राऊत यांची कोणत्याही क्षणी सुटका, जामिनाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
संजय राऊत तब्बल 102 दिवसांनी बाहेर येणार, 31 जुलैला करण्यात आली होती अटक
Sanjay Raut Bail : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patrachawal Scam) खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) मुंबई उच्च न्यायालयानेही दिलासा दिला आहे. त्यामुळे संजय राऊत आता कोणत्याही क्षणी बाहेर येतील. संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात ईडीने हायकोर्टात याचिका केली होती. पण जामिनाला स्थगिती देण्यास उच्चा न्यायालयाने नकार दिला आहे. ईडीचे वकील अनिलसिंह यांनी आग्रही युक्तिवाद केला. तर राऊत यांचे वकील आबाद पोंडा यांनी जामिनाला स्थगिती द्यायला जोरदार विरोध केला. अखेर PMLA कोर्टाचा आदेश हायकोर्टानं मान्य करत उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला.
पीएमएलए कोर्टाने 2 लाखांच्या रोख रकमेवर संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. जामिनाला स्थगिती देण्याची ईडीने (ED) मागणी केली होती. पण ही मागणीही कोर्टाने फेटाळली. ईडीनं जामिनाच्या निर्णयाला विरोध केला होता. तसंच हायकोर्टात याचिका दाखल करेपर्यंत जामिनाला स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीनं पीएमएलए कोर्टाला केली होती.
संजय राऊत यांना पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांचा अनेकदा जामीन नामंजूर केला होता. तब्बल 100 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांचा जेलमधून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन देण्यात आलाय. संजय राऊतांना 31 जुलैला अटक करण्यात आली होती.
आईचे डोळे पाणावले
संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो त्यांच्या आईला. आपल्या लेकाला जामीन मिळाला ही आनंदाची बातमी ऐकून त्यांचे डोळे पाणावले. आपल्या घराच्या गॅलरीत येत थरथरत्या हातांनी त्यांनी सर्वांनाच अभिवादन केलं. आपल्या लेकाला आता भेटता येणार या भावनेने त्या निशब्द झाल्या होत्या.
कार्यकर्त्यांचा जल्लोष, कोर्ट नाराज
शिवसेना खासदार संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर कोर्टाबाहेर त्यांच्या समर्थकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यामुळे कोर्टानं नाराजी व्यक्त केली. नमाडला शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.एकात्मता चौकात जमत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत व पेढे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला.यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.