मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला आहे. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दोन दिवसांपूर्वी पुन्हा छातीत दुखत असल्यामुळे त्यांना २ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिस्चार्ज  मिळाल्यानंतर ते काही दिवस घरीच आराम करणार आहेत. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांना रुग्णालातून घरी सोडण्यात आलं. दरम्यान गेल्या वर्षी त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता पुन्हा त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 


ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून संजय राऊत यांच्या ह्रदयात दोन स्टेन टाकण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी ही शस्त्रक्रिया एप्रिल महिन्यात होणार होती. पण कोरोनामुळे शस्त्रक्रिया आता करण्यात आली आहे.