मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात अत्यंत आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या संजय राऊत यांनी बुधवारी आणखी एक सूचक ट्विट केले. 'जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है', असा मजकूर या संदेशात लिहला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे राऊतांच्या या वक्तव्याचा मतितार्थ काय असावा, याची चर्चा सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन होईल, पण शिवसेनेसोबत चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे सांगितले होते. शिवसेनेने प्रस्ताव द्यावा, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, आम्ही वेगळा प्रस्ताव देणार नाही, जे ठरलंय ते लिखित स्वरुपात द्या, त्यानंतरच चर्चा होईल, असे संजय राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितले होते. त्यामुळे सत्तेची कोंडी कायम राहिली होती. 


मुख्यमंत्री फडणवीस आणि सरसंघचालकांमध्ये चर्चा; युतीचा तिढा सुटणार?



या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या या नव्या ट्विटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजपशी सुरु असलेल्या सत्तासंघर्षात संजय राऊत हे एकहाती शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत. ते दररोज पत्रकारपरिषद घेत असून भाजपला सातत्याने इशारे देत आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून माघार घेणार नाही, हे त्यांनी वारंवार ठणकावून सांगितले आहे.


दरम्यान, काल रात्री राज्यातील सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी उभयंतांमध्ये बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा झाली. आज मुंबईत मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळे आता बुधवारी भाजपकडून शिवसेनेशी संवाद साधला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.