`२०१९ लोकसभा निवडणूक त्रिशंकू, भाजपच्या जागा कमी होणार`
२०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या किमान ११० जागा कमी होतील.
मुंबई : २०१९ साली लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू होईल, असं भाकित शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वर्तवलं. अशा स्थितीत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं नाव सर्वसहमतीनं पंतप्रधानपदासाठी पुढे केलं जाऊ शकतं. तशी चर्चा दिल्लीत सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राऊत यांनी दिली. झी २४ तासच्या मुक्तचर्चेत त्यांनी संवाद साधला. २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या किमान ११० जागा कमी होतील, असा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही कृतीमागे दीर्घकालीन विचार असतो, असा आपला अनुभव असल्याचं राऊत म्हणाले. या पार्श्वभूमीवर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास प्रणवदांचं नाव पुढे केलं जाऊ शकतं, असा राऊत यांचा दावा आहे. तर अमित शाह-उद्धव ठाकरेंच्या बैठकीत काय झालं, हे त्यांनी सांगितलेलं नाही. मात्र युती होणार की नाही, याचा निर्णय हे नेतेच घेतील असंही राऊत म्हणाले.