एकही आमदार नव्हता तेव्हाही शिवसेना तोऱ्यातच वागायची- संजय राऊत
मुख्यमंत्र्यांनी लाचारी शब्द वापरणे चुकीचे आहे.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीसंदर्भात शिवसेनेला दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर पलटवार केला. कोणत्याही पक्षाचे मोठेपण संख्याबळावर ठरत नसते. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून स्वत:च्या ताकदीवर खंबीरपणे उभी आहे. एक आमदार नव्हता तेव्हाही शिवसेना तोऱ्यात वागायची आणि आजही तो कायम आहे, असे प्रत्युत्तर राऊत यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जालना येथील सभेत शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला होता. आम्हाला देशाच्या कल्याणासाठी युती करायची आहे. मात्र, त्यासाठी भाजप लाचारी पत्कारणार नाही. ज्यांना हिंदुत्त्ववाद हवा आहे, ते आमच्यासोबत येतील. ज्यांना हिंदुत्त्व नको असेल ते दूर जातील. जे सोबत असतील त्यांच्या साथीने आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी गर्जना फडणवीसांनी केली होती.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी लाचारी शब्द वापरणे चुकीचे आहे. प्रत्येकजण स्वत:च्या पायावर उभा असतो, कोणीही लाचार नसतो. युतीचा विषय आम्ही सुरुच केला नव्हता. त्यामुळे लाचारीचा प्रश्न येत नाही. युती तोडणाऱ्यांना आता पुन्हा एकत्र यावेसे वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. २०१४ साली युती तोडताना त्यांना हिंदुत्ववादी मतांची विभागणी होण्याची चिंता वाटली नाही का, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सोमवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेचा सूर काहीसा मवाळ झालेला दिसत आहे. सन्मानजनक प्रस्ताव आल्यास विचार करू, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती. मात्र, महाराष्ट्रात शिवसेना कायमच मोठा भाऊ राहील. हा मोठा भाऊ दिल्लीचे तख्त गदागदा हलवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.