`त्यांचे भविष्यात फार काही...`; ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
सोमवारी ठाण्याच्या किसननगर भागात ठाकरे गटाच्या दोन पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला
मुंबई : ठाण्यातील (Thane) वागळे इस्टेट परिसरात पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट (Thackeray group vs Shinde Group) आमनेसामने आले. वागळे इस्टेट येथील किसननगर भागात ठाकरे गटाच्या दोन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या घटनेप्रकरणी दोन्ही गटांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. या मारहाणीत ठाकरे गटाचा एक कार्यकर्ता जखमी झाला असून त्याच्यावर ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या श्रीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मारामारी झाली त्यावेळेस खासदार राजन विचारे (Rajan vichare), शिवसेनेने दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे तिथे उपस्थित होते. श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही गट समोरासमोर आल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
"असे प्रकार नारायण राणे गेले तेव्हासुद्धा झाले होते. आता ते कुठे आहेत. आज सत्ता, ताकद, पैसा आहे म्हणून तुम्ही शिवसैनिकांवर हल्ले करणार असाल तर त्यांचे रक्त एवढं स्वस्त नाही हे लक्षात ठेवा. शिवसैनिकाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब गेल्या पन्नास वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आहे. ज्याने शिवसैनिकाचा रक्त सांडण्याचा प्रयत्न केला ते पूर्णपणे नष्ट झाले आणि त्यांच भविष्यात फार काही चांगलं झालं नाही," असे संजय राऊत म्हणाले.
नेमकं घडलं काय?
गेल्या आठवड्यात ठाकरे गटाकडून ठाणे उपजिल्हाप्रमुख म्हणून संजय घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. संजय घाडीगावकर हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील आहेत. संजय घाडीगावकर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाचे माजी नगरसेवक योगेश जानकर हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत जात असताना दोन्ही गट आमनेसामने आले आणि जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाचीला सुरुवात झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आहे. यावेळी शिंदे गटाकडून आमच्या अंगावर कोणी आले तर सोडणारा नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आली. तर ठाकरे गटाकडून या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.