मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामधून टीका केल्यानंतर अभिनेता सोनू सूद यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतरही संजय राऊत यांनी सोनू सूदला खोचक टोला लगावला आहे. 'अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला. मातोश्रीवर पोहोचले,' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी सोनू सूद आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सोनू सूदबरोबर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखही उपस्थित होते. 



दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याआधी सोनू सूद याने मराठीमध्ये ट्विट केलं. 'स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं,' असं सोनू त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.



कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सोनू सूदने आर्थिक मदत केली. यावरून संजय राऊत यांनी सोनू सूदवर निशाणा साधला. सोनू सूदला दत्तक घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचं राजकारण सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी सामनामधून केली. सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातील काही घटक 'ठाकरे सरकार'ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते, असं राऊत म्हणाले. 


सोनू सूदला 'दत्तक' घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण- राऊत