तपास संपू द्या, मग बघू - संजय राऊत
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते.
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले होते. 5 जानेवारी रोजी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितले होते. मात्र त्या एक दिवस आधीच म्हणजे आज चौकशीसाठी उपस्थित राहिल्या. त्यांची तीन तास चौकशी सुरू होती. याबद्दल संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, 'वर्षा राऊत या ईडी कार्यालयात गेल्या आहेत, हे माध्यमांद्वारे समजलं आहे. त्या घरी आल्यानंतर बघू. सरकारी कागदाचा आम्ही सन्मान करतो. त्यामुळे तपास पूर्ण होवू द्या मग बघू...' अशी स्पष्ट भूमिका संजय राऊतांनी मांडली.
सध्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईडीने नोटीसा बजावल्या आहेत, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावला. त्यांची आज चौकशी देखील झाली. त्याचबरोबर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांनाही ईडीने चौकशीसाठी बोललं आहे.