दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : सत्तास्थापनेबाबत शिवसेना आणि भाजपाची चर्चा पूर्णत: फिस्कटल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर समोर येतंय. विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी, राज्यपालांनी वैकल्पिक व्यवस्था तयार होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आपल्याला काम पाहायला सांगितल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सोबतच, 'भाजपासोबत चर्चा नाही मात्र आघाडीसोबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे वेळ आहे' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केलंय. उल्लेखनीय म्हणजे, फडणवीस यांची ही पत्रकार परिषद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकत्र बसूनच पाहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदमध्ये स्टेजवर पहिल्या रांगेत बावनकुळे, संजय कुटे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, विनोद तावडे उपस्थित होते. तर दुसऱ्या रांगेत सुजितसिंह ठाकूर, राम शिंदे, राम कदम, सुभाष देशमुख, प्रसाद लाड, अभिमन्यू पवार, रावल बसलेले दिसले. 


दरम्यान, याआधी शुक्रवारी आरपीआय नेते रामदास आठवले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी 'सिल्व्हर ओक'वर दाखल झाले. यावेळी 'अडचणीच्या काळात नेहमीप्रमाणेच सल्ला घेण्यासाठी पवारांकडे आलो असल्याचं' रामदास आठवले यांनी यावेळी म्हटलं. परंतु, 'भाजपा आणि शिवसेना यांच्या महायुतीला जनादेश मिळालाय. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन करावं' असंच आपल्याला पवारांनी म्हटल्याचंही आठवलेंनी यावेळी सांगितलं. तुम्हीच शिवसेना आणि भाजपा सरकार स्थापन करण्याचा सल्ला द्या, असं म्हटल्याचंही आठवले यांनी सांगितलं. 



आठवलेंच्या भेटीनंतर काही वेळातच शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. नेमकी या भेटीच्या वेळीच देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद या दोघांनी एकत्रितपणेच पाहिली.