मुंबई : शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अग्रलेखातून 'श्रीलंकेप्रमाणे भारतातही बुरखा बंदीचा निर्णय सरकारने घ्यावा' या संदर्भात वादग्रस्तं मागणी सामनाच्या अग्रलेखातून केली होती. यानंतर  शिवसेनेच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले. देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे विधान हे शिवसेनेला परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे शिवसेना पक्षातच वादळ निर्माण झाले.


नाराजीचा सूर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नाराजीला संजय राऊत यांना सामोरे जावे लागले होतं. शिवसेना प्रवक्त्या निलम गो-हे यांनी बुरखा बंदी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शिवसेनेत एकटे पडलेले संजय राऊत यांनी आजच्या रोखठोक या सदरात सपशेल माघार घेत, बूरखा बंदीची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नसल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. तसेच बुरखा बंदी ची भूमिका ही केवळ सामाजिक जाणिवेतून केल्याची सारवासारवही या सदरातून संजय राऊत यांनी केलीय.



पक्षाची भूमिका बैठकीत ठरते, असं शिवसेनेच्या प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी याबाबत केले. बुरखाबंदीबाबतचा अग्रलेख ही वैयक्तिक भूमिका असून शिवसेना पक्ष त्याच्याशी सहमत नसल्याचंही नीलम गोऱ्हेंनी सांगितले. त्यामुळे, आता शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या 'सामना'चा अग्रलेख आणि पक्षाची भूमिका वेगळी कशी काय असू शकते? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवाल उपस्थित १ मे २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून विचारण्यात आला. भारतातही बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून केली गेली. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनीही बुरखाबंदी झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.