मुंबईत फाल्गुनी पाठकच्या ‘गरबा नाईट’च्या नावाखाली 156 तरुणांची फसवणूक; लाखो रुपये लुटले!
Mumbai Crime News : प्रसिद्ध गरबा क्वीन फाल्गुनी पाठक (falguni pathak) यांच्या गरबा नाईटचे अनेक प्रोग्राम आयोजित केले जातात. अशातच आता फाल्गुनी पाठकच्या गरबा (Garba Nights) कार्यक्रमासाठी मुंबईतील अनेकांना लुटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Falguni Pathak garba program : मुंबईत प्रसिद्ध दांडिया आणि गरबा क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाईट’चे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मुंबईत गुजराती लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ठिकठिकाणी फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्यांच्या कार्यक्रमासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच आता मुंबईतील बोरिवली परिसरात तब्बल 156 तरुणांची लुट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत 406, 420 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असला तरी अद्याप आरोपीचा शोध लागला नाही. सहभागी होण्यासाठी पासची किंमत 4,500 रुपये आहे. काही भामट्यांनी स्वस्तात पासचे आमिष दाखवून 156 तरुणांना लुटलं. कार्यक्रमासाठी पास 4,500 रुपयांऐवजी 3,300 रुपयांना मिळेल, असं अमिष दाखवून तरुणांनी अनेकांना लुटलं आहे. कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला पहिला गंडा घातला. त्यानंतर त्यांनी पास आणखी असल्याचं सांगून एकून 156 जणांकडून पैसे गोळा केले अन् पास देण्याचं मान्य केलं.
बोरिवली न्यू लिंक रोडला येऊन पैसे दे, असा सुचना त्याला देण्यात आल्या होत्या. त्यानंतर तरुणांनी तिथं जाऊन विशाल शाह या तरुणाला पैसे दिले. त्यानंतर शाह याने दुसऱ्या ठिकाणचा (योगी नगर) पत्ता सांगितला आणि तिथं पोहोचल्यानंतर पास घेण्यास सांगितलं. मात्र, त्यांना हा पत्ता सापडला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं तरुणांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील एम.एच.बी. पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केली.
दरम्यान, या प्रकरणात सध्या पोलिस तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या मदतीने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. अनेकदा आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो. मात्र, अर्थकारणाच्या बाबतीत सखोल चौकशी करून व्यवहार करणं गरजेचं आहे.