मुंबई : शिवसेनाप्रणित कामगार सेनेनं बेस्टच्या संपातून माघार घेतली असली तरी कामगार मात्र अजूनही कामावर रुजू झालेले नाही. शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली 'बेस्ट कृती समिती'नं संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय. 'बेस्ट'च्या ५०० हून अधिक बेस्टच्या बस रस्त्यावर धावतील, अशी घोषणा शिवसेनेनं केली होती. परंतु, शिवसेनेने संपातून माघार घेतल्या नंतरही बेस्ट कर्मचारी दुसऱ्या दिवशीही गैरहजर राहिले. 


आज सकाळी सहा वाजताच्या आकडेवारीनुसार,


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- बस ड्रायव्हर १२४० पैकी ५ जण हजर


- बस कन्डक्टर ११९० पैकी ५ जण हजर


- बस निरीक्षक १२३ पैकी ३६ जण हजर


- बस स्टार्टर १४८ पैकी १३ जण हजर


अर्थातच, यामुळे शिवसेनेने ५०० बस रस्त्यावर उतरवणार, अशी केलेली घोषणा फोल ठरल्याचं स्पष्ट दिसून येतंय. 


अधिक वाचा : चर्चा निष्फळ, 'बेस्ट' कामगारांचा संप कायम


शिवसेनेचे गोंधळलेली अवस्था


मंगळवारी, बेस्ट कर्मचारी संघटना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात बैठक पार पडली. परंतु, या बैठकीत मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. उल्लेखनीय म्हणजे, संप सुरू करण्यापूर्वी शिवसेनाप्रणित कामगार सेना या संघटनेनं आपण या संपात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं होतं. परंतु, काल होणाऱ्या बैठकीच्याआधी 'आपला या संपाला नैतिक पाठिंबा' असल्याची उपरती या संघटनेला अचानक झाली आणि त्यांनी बैठकीत सहभागी होण्याचा प्रयत्न केला. यावर बेस्ट कृती समितीच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. 'शिवसेनेची कामगार संघटना बैठकीत उपस्थित राहणार असेल तर बैठकीत येणार नाही', अशी भूमिका बेस्ट कृती समितीनं घेतली... आणि मग बेस्ट कामगार सेनेशिवाय ही बैठक पार पडली. त्यामुळे, बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट कृति समिती या दोन संघटनांमधला वाद चव्हाट्यावर आला. तसंच बेस्टच्या संपाबाबत शिवसेनेची भूमिका गोंधळलेली असल्याचे पाहायला मिळाली. एकीकडे संप नको चर्चा करा असं आवाहन करणाऱ्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार संघटनेचे अकरा हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शिवसेनेची अडचण झालीय. 


'बेस्टच्या जागा विकण्याचा डाव' 


मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीला बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समिती सरचिटणीस शशांक राव, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर, आयुक्त अजॉय मेहता हे उपस्थित राहिले. मात्र, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे हे मात्र या बैठकीला गैरहजर राहिले. या बैठकीनंतर 'तोटा असल्याचं दाखवत सत्ताधारी शिवसेना बेस्टच्या जागा विकण्याचा डाव रचत असल्याचा' आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला.