विविधतेत एकता दर्शवणारं मुंबई पोलिसांचं `हे` ट्विट पाहाच
प्रत्येक धर्माची आणि त्यात असणाऱ्या रुढी परंपरांची भारतात तितक्याच आपुलकीने जपणूक केली जाते.
भारत हा एक विविधतेत एकता असणारा देश आहे. हे आपण सर्व जाणतोच किंबहुना शालेय जीवनापासूनच याविषयीची शिकवण आपल्याला दिली जाते. अशा या देशात विविध धर्माचे लोक एकत्र मोठ्या गुण्यागोविंदाने राहतात. मुख्य म्हणजे प्रत्येक धर्माची आणि त्यात असणाऱ्या रुढी परंपरांची भारतात तितक्याच आपुलकीने जपणूक केली जाते. सध्याच्या घडीला मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटमधूनही हाच संदेश मिळत आहे असं म्हणावं लागेल. गणेशोत्सव आणि मोहरम या दोन्हींचं महत्त्व लक्षात घेत अतिशय लक्षवेधी असं ट्विट त्यांनी केलं आहे.
गणेशोत्सवाच्या रंगात सारी मुंबई रंगली असली तरीही या शहरात मोहरमसाठीही तशीच तयारी करण्यात आल्याचं टा ट्विटमधून पाहायला मिळत आहे. मुंबईतील अंबिका नगर येथे एका गणपती मंडळाच्या अगदी शेजारीच सबिल ठेवण्यात आल्याचं या फोटोत दिसत आहे.
मुस्लिम समुदायाकडून गणरायाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांना तहान लागल्यास त्यांची तहान भागवण्यासाठी म्हणून सबिल ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
तुम्ही हे नीट पाहिलं असेल तरच तुम्हाला त्याची अनुभूती होईल, असंही ट्विटमध्ये लिहिण्यात आलं आहे. त्यासोबत #UnityInDiversity असा हॅशटॅगही देण्यात आला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मुंबई पोलिसांचे विविध ट्विट नेहेमीच प्रकाशझोतात येतात त्यातच आता या ट्विटचीही भर पडली आहे हे खरं. या ट्विटची बरीच चर्चाही झाली असून, अनेकांनीच त्याचं कौतुकही केलं आहे.