विरार : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन ही साखळी तोडण्यासाठी अथक प्रयत्न करत असताना रुग्णालयातून पळ काढणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनासमोरील आव्हान अधिक वाढल्याचं चित्र समोर येत आहे. दरम्यान विरारमध्ये एका रुग्णाने रुग्णालयातून पळ काढला आहे. दीड लाखांचं बिल आल्यामुळे अखेर रुग्णाने उपचार न घेता पळून जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरारच्या विजय बल्लभ रुग्णालयात ही घटना घडली आहे. पळून गेलेला रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर रुग्णांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्याने डॉक्टरांनाच उलट उत्तर दिल्याचं सांगण्यात येत आहे. 



डॉक्टर आणि रुग्णामध्ये झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रुग्णालयातून रुग्ण पळाल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस त्या रुग्णाचा तपास घेत आहेत. 


दरम्यान, मागच्या २४ तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ९,२५१ ने वाढली आहे, तर २५७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या एका दिवसात ७,२२७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे, त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २,०७,१९४ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५६.५५ टक्के एवढं झालं आहे.