`तेलगीचा पैसा आम्हाल नको!, सरकारजमा करा`
तेलगीचा बंगळुरू येथील रुग्णालयात नुकताच मृत्यू झाला. त्यानंतर पत्नी शाहिदाने न्यायालयाकडे अर्ज केला आहे.
मुंबई : केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात खळबळ उडववून देणाऱ्या मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगी याच्या संपत्तीचे काय होणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, अब्दुलची पत्नी शाहिदा हिने विशेष न्यायालयाकडे अर्ज केला असून, त्यात तेलगीची मालमत्ता आम्हाला नको. ती सरकारजमा करून घ्या. तसेच, या प्ररणाचा फेरतपास करावा, अशी मागणी केली आहे. तेलगीचा बंगळुरू येथील रुग्णालयात नुकताच मृत्यू झाला. त्यानंतर पत्नी शाहिदाने न्यायालयाकडे अर्ज केला आहे.
मुद्रांक घोटाळा प्रकरणी खटला अद्यापही सुरूच
मुद्रांक घोटाल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. यात अनेक अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत आरोप प्रत्यारोप झाले होते. अनेकांची नावे आली होती. अनेक उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेते, पोलीस अधिकारी यांनाही या प्रकरणात आरोपी करून अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाची देशभर चर्चा झाली होती. आजही या प्रकरणातील अनेक आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला नाही. त्यामुळे या आरोपींविरूद्ध शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावनी सुरू आहे. ही सुनावनी विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाखाली सुरू आहे.
तेलगीची पत्नीही होती आरोपी
दरम्यान, तेलगीची पत्नी शाहिदा हिलासुद्धा या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाकडून तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. शाहिदा तेलगी (वय ५७, रा. खानापूर, बेळगाव, कर्नाटक) प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त आहे. महत्त्वाचे असे की, या प्रकरणात तेलगीने प्रचंड पैसा कमावला. त्यातून कोट्यवधीच्या मालमत्ता खरेदी केल्या. मात्र, या मालमत्ता सीबीआयने अद्यापपर्यंत सरकारजमा केल्या नव्हत्या. त्यामुळे तेलगीच्या स्थावर मालमत्तेबाबत सीबीआयने फेरतपास करावा आणि तेलगीची संपत्ती सरकारजमा करावी अशी मागणी तेलगीची पत्नी शाहिदा हिने केली आहे.