मातोश्रीवर मोठ्या राजकीय हालचाली; शिवसेना-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये निर्णायक चर्चा
शरद पवार, अनिल देशमुख मातोश्रीवर दाखल...
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. काहीवेळापूर्वीच शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते मातोश्रीवर दाखल झाले होते. तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हेदेखील मातोश्रीवर दाखल झाले आहेत. काहीवेळातच अजित पवार याठिकाणी येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मातोश्रीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे.
LIVE UPDATES
* शरद पवार मातोश्रीवरुन बाहेर पडले, बैठक संपली
- एकनाथ शिंदे मातोश्रीवर पोहचले
- शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरु
- शरद पवार, अनिल देशमुख यांच्यासह जितेंद्र आव्हाड, सुभाष देसाईही मातोश्रीवर पोहचले आहेत.
मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसामध्येच रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. याबाबत या नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या तात्काळ रद्द करुन राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे मानले जाते. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या गोटातूनही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या सगळ्यामुळे तीन पक्षांच्या सरकारच्या स्थैर्याविषयी अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत.