शरद पवार आणि छगन भुजबळांची बंद दाराआड बैठक
गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा सुरु आहे.
मुंबई : मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि शरद पवारांमध्ये बंद खोलीत चर्चा सुरू आहे. पवारांकडून भुजबळांची मनधरणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा सुरु आहे. मध्यंतरी ते अगदी मातोश्रीवर जाणार अशा बातम्याही आल्या होत्या. मात्र, ऐनवेळी भुजबळांचा शिवसेनेतील प्रवेश बारगळला होता.
गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या बैठका आणि सभांकडे भुजबळांनी पाठ फिरवली आहे. भुजबळ शिवसेनेच्या संपर्कात असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. भुजबळ राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. त्यामुळे भुजबळांनी पक्ष सोडला तर तो राष्ट्रवादीला मोठा धक्का असेल.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील सभेसाठी देखील भुजबळ गैरहजर होते. भुजबळांची प्रकृती ठिक नसल्याने ते निफाडच्या सभेला गैरहजर राहिले असल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. मात्र, त्याचवेळी भुजबळ आपल्या येवला मतदारसंघात विविध कार्यक्रमात व्यस्त दिसत होते. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीपासून दूर जात असल्याची चर्चा त्यांच्या येवला मतदारसंघात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांची मनधरणी करण्यासाठी भेट घेतली होती. परंतु यात ते अयशस्वी ठरले. आता पवार भुजबळ यांची मनधरणी करणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.