मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं विश्लेषण राष्ट्रवादीकडून सुरु आहे. शरद पवारांनी विरोधकांच्या पराभवाला राहुल गांधींच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला आहे. निवडणुकीत नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी असं चित्र उभं करण्यात आलं. यामध्ये नरेंद्र मोदी हेच उजवे ठरले त्याचाच भाजपला फायदा झाल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीला असं चित्र नसणार अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विधानसभेला मोदी समोर येणार नाहीत, या निवडणुकीत लोक उमेदवार पाहून मतं देतील असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होती. दोघांनीही एकत्र निवडणूक लढवली पण तरी देखील त्यांना जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. राज्यात युतीला ४८ पैकी ४१ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या माढा आणि मावळ मधून देखील राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला.


लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपने ३०३ जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा उडवला. काँग्रेसमध्ये देखील या पराभवानंतर निराशा पसरली आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांनी देखील अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून पक्षातील नेते प्रयत्न करत आहे. पण अजून तरी राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम आहेत. 


याआधी मोदी पुन्हा सत्तेवर आले तर त्याला राहुल गांधी हेच जबाबदार असतील असं आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते. विरोधकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केल्याचा आरोप त्यांनी केला होता.