Election Results 2019: पार्थच्या दारूण पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
देशातील लोकांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून भाजपला मत दिले.
मुंबई: मावळ मतदारसंघातील पार्थ पवार यांच्या पराभवानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मावळची जागा राष्ट्रवादीला जिंकण्यासारखी नव्हतीच असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पार्थला निवडणुकीला उभे राहता यावे म्हणून मी माढ्यातून माघार घेतली नव्हती. तसेच मावळ मतदारसंघात आमचा विजय होईल, अशी अपेक्षा आम्ही कधी केलीच नव्हती, असे शरद पवार यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेले निकाल पाहता भाजपला महाराष्ट्रासह देशभरात घवघवीत यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पवारांनी म्हटले की, आम्ही हे निकाल मनापासून स्वीकारतो. देशातील लोकांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून भाजपला मत दिले. आम्ही राष्ट्रीय मुद्द्यांवर लोकांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरलो. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. यंदा तशी परिस्थिती राहिलेली नाही. याशिवाय, भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी त्याला संशयाची किनार आहे. यापूर्वी कधीही देशातील जनतेच्या मनात निवडणूक आयोग किंवा निवडणुकीच्या कार्यपद्धतीविषयी शंका उपस्थित झाली नव्हती. मात्र, यश हे यशचे असते आणि आम्ही त्याचा स्वीकार करतो, असेही पवारांनी म्हटले. परंतु, हे अपयश बाजूला सारून आम्ही यापुढे प्रभावीपणे लोकांशी संपर्क साधू आणि जनाधार वाढवण्याची खबरदारी घेऊ, अशी पुस्तीही पवारांनी जोडली.
राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागांवर विजय मिळेल, अशी अपेक्षा आम्हाला होती. आतापर्यंच चार मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार विजयी ठरले आहेत. तर माढा, अमरावती, बुलढाणा आणि परभणी या मतदारसंघांमध्येही आम्हाला विजयाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानले. आमच्या प्रचारात कोणतीही चूक झाली नाही. किंबहुना आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, विरोधकांची शक्तीकेंद्रे त्या त्या राज्यांपुरती मर्यादित असल्याने राष्ट्रीय पातळीवर आमचे प्रयत्न कमी पडले. तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा आगामी विधानसभा निवडणुकीवर कोणताही प्रभाव पडणार नाही, असा दावाही यावेळी पवारांनी केला.