महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? पवार म्हणतात, `दिल्लीतील आजच्या बैठकीत..`
Sharad Pawar Press Conference: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं. यावेळेस त्यांनी आज दिल्लीत जागावाटपासाठी होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीबद्दलही भाष्य केलं.
Sharad Pawar Press Conference: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी बिल्कीस बानू प्रकरणापासून ते महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी नवी दिल्लीमध्ये घटकपक्षांच्या बैठकीसंदर्भात अनेक गोष्टींवर भाष्य केलं. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गटामध्ये सुरु असलेल्या वादावर उद्या म्हणजेच 10 जानेवारी रोजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार असलेल्या निकालाबद्दलही पवारांनी सूचक विधान केलं.
बिल्कीस बानू निकाल महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने घ्यावा
"काल सर्वोच्च न्यायालयाचा बिल्कीस बानू प्रकरणासंदर्भात झालेला निकाल हा आपघात होता. उशीर झाला पण सर्वोच्च न्यायालयाने स्त्री वर्गाला आणि सामान्य माणसाला कालच्या निर्णयाने आधार दिलाय," असं शरद पवार म्हणाले. "महाराष्ट्र सरकारने हा निकाल गांभीर्याने घेवून कुठलाही राजकीय अभिनवेश न आणता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून राज्याच्या गृहमंत्र्यांनी आशा प्रवृत्ती मोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत," असं शरद पवार म्हणाले. बिल्कीस बानू प्रकरणामध्ये गुजरात सरकारने त्यांना माफी द्यायला नको होती आशि सामान्य माणसात चर्चा होती, असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्र सरकारनेही हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला पाहिजे. याला नजरेआड घालता कामा नये, असंही पवार म्हणाले आहेत.
आज दिल्लीत बैठक
दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक होणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं. "आज दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची बैठक होईल. आमच्याकडून या बैठकीला जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील. प्रकाश आंबेडकर आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांना यात सहभागी करावे अशी भूमिका आहे," असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. "आज प्राथमिक बैठक आहे. या बैठकीमध्ये फॉर्म्युलावर प्राथमिक चर्चा होईल. प्रकाश आंबेडकर आणि डाव्या पक्षांना सोबत घेण्याची मागणी आजच्या बैठकीत आम्ही करु," असंही शरद पवार म्हणाले.
परतीचे दरवाजे बंद
परतीसाठीचे दरवाजे प्रमुख नेत्यांसाठी बंद आहेत, असं शरद पवार यांनी अजित पवारांसाठी परतीचे दोर कापले गेल्याचं सांगत केलं. तसेच शिवसेनेतील वादासंदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांचा निकाल आल्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होईल, असंही शरद पवार म्हणाले.
वयावरुन होणाऱ्या टीकेवरुन टोला
अजित पवारांकडून सातत्याने वयावरुन टीका होत असल्याच्या संदर्भातून बोलताना शरद पवारांनी, "प्रश्न वयाचा असेल तर खूप उदाहरण सांगता येतील. पण यावर जास्त काही बोलणार नाही. याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही. त्याला नजर आंदाज करणे चांगले," असं उत्तर दिलं.
राष्ट्रवादी वादात दोन्हीकडील बाजू मांडून झाल्या...
राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाबाबतच्या वादावर बोलताना शरद पवारांनी, "दोन्हीकडून बाजू मांडून झाल्या आहेत. पण निर्णय अद्याप आलेला नाही. आम्ही निकालाची वाट बघतोय," असं सांगितलं.